माळेगावचा कारभारी कोण? उद्या लागणार निकाल! अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

               पुरंदर रिपोर्टर Live 

विजय लकडे…

                पुणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल उद्या २४ जून रोजी जाहीर होणार आहे. काल (२२ जून) पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर मतपेट्यांतील बंदिस्त निर्णयावर साऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

                   या निवडणुकीत तब्बल ८८ टक्के मतदान झाले असून, अ वर्गातील १७,२९६ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः ‘ब’ वर्ग प्रतिनिधी म्हणून रिंगणात असून, ब वर्गातील १०२ पैकी १०१ मतदारांनी मतदान केले आहे.


प्रतिष्ठेचा सामना – पवार विरुद्ध तावरे

                    या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील बळीराजा सहकार बचाव पॅनल यांच्यात थेट सामना रंगला आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागील पाच वर्षांपासून या कारखान्यावर अजित पवार गटाचे वर्चस्व राहिले असले तरी यंदा तावरे गटाने अधिक आक्रमकता दाखवत पवारांना जोरदार टक्कर दिली. या निवडणुकीत चार पॅनल मैदानात उतरले होते. मात्र मुख्य लढत ही पवार गट विरुद्ध तावरे गट अशी पाहिली जात आहे.

                        सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी शक्यता होती, मात्र १३ जून रोजी अजित पवारांनी शरद पवार गटाला एकही जागा न देता स्वतःचे उमेदवार जाहीर केले. त्यामुळे शरद पवार समर्थकांनी आपले स्वतंत्र पॅनल (बळीराजा सहकार बचाव) उतरवले, पण अजित पवारांच्या विरोधात थेट उमेदवार दिला नाही.

दुसरीकडे कष्टकरी शेतकरी समिती देखील आपल्या स्वतंत्र पॅनलसह निवडणुकीच्या रिंगणात आहे!

‘माळेगाव’चा निर्णय ठरवणार भविष्यातील राजकीय समीकरणं?

          अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत त्यांना या कारखान्यासाठी १२ जाहीर सभा घ्याव्या लागल्या, यावरून निवडणूक किती चुरशीची होती हे स्पष्ट होते. या मतमोजणीत त्यांचं पॅनल विजयी झाल्यास त्यांच्या नेतृत्वाला बळकटी मिळेल. मात्र अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्यास त्यांच्यावर राजकीय आघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बारामतीत विक्रमी मतदान

                सांगवी, पणदरे, बारामती, नीरावागज आणि माळेगाव या गटांमध्ये विक्रमी मतदान झालं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकूण ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून, उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.


माळेगावच्या ‘सिंहासनावर’ कोण बसणार?

               उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार स्वतः या निवडणुकीत उतरले असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी होतं की तावरे गट बाजी मारतो, हे पाहण्यासाठी आता केवळ काही तासांची प्रतीक्षा बाकी आहे.

Post a Comment

0 Comments